मुंबई-गोवा हायवेवर तिहेरी अपघात; 8 जण जखमी

मुंबई – गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात अपघाताचे सत्र कायम असून रविवारी सिमेंट बलगर ट्रक, इर्टीगा कार व अन्य एक ट्रक व दुचाकी अशा चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात ट्रक मधील दोघे व कार मधील 6 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटच्या मोठय़ा ट्रेलरने समोर चाललेल्या इर्टिगा कारला जोरदार धडक देऊन त्यानंतर भोस्ते घाटात नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात नादुरुस्त उभा ट्रक जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळला तर इर्टीगा गाडी ट्रेलरच्या धडकेने डिव्हायडर तोडून दुसऱया लेनमध्ये गेली. या दरम्यान समोरुन येणाऱया दुचाकी ला या मोटारींची धडक बसली. दोन्ही वाहनांना धडक दिल्यानंतर सिमेंटचा ट्रेलर देखील दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन अडकला. ट्रेलर मधील चालक आणि वाहक असे दोन जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या साठी श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिका, नरेंद्र महाराज रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका यांनी मदत कार्य करत जखमी ना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

अशी आहेत जखमींची नावे

संस्कृती संतोष कदम (42), जागृती वैभव शिंदे (35), शोभा सदानंद कदम (60), संतोष एकनाथ कदम (51), मयुरी सदानंद कदम ( 30), व जयराम वैभव सुर्वे (14 सर्व रा. मुंबई) अशी कार मधील जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. तर ट्रक चालक राज शेखर मंगळी (26), क्लिनर मल्लिकार्जुन काजी (32) अशी ट्रक मधील जखमी झालेल्यांची नावे आहेत.