ज्ञानसाधक वामनरावांच्या स्मृतींना उजाळा, जन्मशताब्दीनिमित्त जन्मगावी कुटुंबीयांनी जागवल्या आठवणी

शिवसेनेचे पहिले आमदार, पहिले खासदार, महापौर, नगरसेवक तसेच तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रिन्सिपल वामनराव महाडिक (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त सिंधुदुर्ग तळेरे येथील त्यांच्या जन्मगावी त्यांच्या कुटुंबीयांनी आदरांजली वाहिली. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तळेरे येथे वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

वामनराव महाडिक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱया कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बावधनकर यांनी त्यांच्या भाषणात कर्तृत्ववान व वात्सल्यमूर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रिं. वामनराव महाडिक असा उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रमुख पाहुणे डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी प्रिं. वामनराव महाडिक हे ज्ञानसाधक होते अशा शब्दांत आदरांजली वाहिली. या पिढीने आप्पांच्या अफाट कार्याची ओळख करून घ्यावी व त्यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून जगामध्ये आपला ठसा उमटवावा, असे डॉ. चित्रा ठाकूर-महाडिक यांनी नमूद केले. आप्पांची नात डॉ. वैभवी भस्मे यांनी आपल्या भाषणात आप्पांची अलौकिक प्रतिभावंत बुद्धिमत्ता तसेच ज्ञानाने परिपूर्ण असे त्यांचे विचार व शिकवण आजही आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत, असे सांगितले. आप्पांची कन्या शारदा भस्मे-महाडिक यांनी आपल्या भाषणात आप्पा हे सरस्वतीचे उपासक तसेच हाडाचे शिक्षक होते. आप्पांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले. याच्या मागे त्यांच्या पत्नी लक्ष्मी महाडिक यांचे खूप मोठे योगदान आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आप्पांची कन्या राधा कडूसकर-महाडिक यांनी आपल्या भाषणात आप्पांची शैक्षणिक तळमळ पाहता त्यांनी कुटुंबातील त्यांचे भाऊ-बहीण व त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन स्वावलंबी केले. हजारो तरुणांना नोकऱया दिल्या. तसेच शैक्षणिक संकुल उभारण्यात जमीन व इतर देणगीदार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला प्रेषित महाडिक, कश्मीरा महाडिक, शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक, घनश्याम कडूसकर, विजय भस्मे, प्राचार्य अविनाश मांजरेकर, रमाकांत वरुणकर, दिलीप तळेकर आणि संस्थेचे सर्व मान्यवर उपस्थित होते.

संदीप कोळेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

शैक्षणिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे प्रिं. वामनराव महाडिक यांच्या कार्याचा वारसा पुढे अविरत ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी जयंतीनिमित्त या वर्षीपासून ‘प्रिं. वामनराव महाडिक आदर्श शिक्षक’ पुरस्कार देण्याची घोषणा केली. यावर्षीचा पहिला पुरस्कार प्राथमिक शाळा, नाधवडे ब्राह्मणदेवी नवलादेवी वाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक संदीप कोळेकर यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले.