मिलिंद रेगे म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटच; मुंबई क्रिकेट जगताने वाहिली आदरांजली

मिलिंद रेगे म्हणजे क्रिकेट. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेटच त्यांचा श्वास आणि ध्यास राहिला. ते मुंबई क्रिकेटचे दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू होते. चांगले निवडकर्ते होते. उत्तम प्रशासक होते. मुंबई क्रिकेटचे मार्गदर्शक होते. सर्वांचे मित्र होते. आपल्या मतांवर कायम ठाम असलेले कट्टर क्रिकेटसेवक होते, अशा शब्दांत मिलिंद यांच्या क्रिकेटसेवेला मुंबई क्रिकेट जगताने आदरांजली वाहिली.

गेली चार दशके क्रिकेटच्या विकासासाठी झटणारा आणि झपाटलेला क्रिकेटचा अस्सल चाहता मुंबई क्रिकेटने गमावला. ते अनेकांचे मित्र होते. अनेकांचे मार्गदर्शक होते. ते अनेकांचे गॉडफादर होते. तसेच ते अनेकांचे हितचिंतकही होते. त्यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत वळणावळणावर विविध रंगाच्या भूमिका चोख पार पाडल्या. पण त्यांची सर्वात लोकप्रिय ठरलेली भूमिका म्हणजे निवडकर्त्याची. त्यांनी मुंबई क्रिकेटसाठी एखाद्या रत्नपारख्याप्रमाणे शोधून काढलेली रत्नं मुंबईच नव्हे, तर हिंदुस्थानी क्रिकेटसाठी मोलाची ठरली. त्यामुळे आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

मुंबई क्रिकेटसाठी झटलेल्या मिलिंद रेगे यांची शोकसभा वानखेडे स्टेडियमच्या हिरवळीवर आयोजित करण्यात आली. या आदरांजली सभेला रेगे कुटुंबीयांसह बलविंदरसिंग संधू, अमोल मुझुमदार, समीर दिघे, डायना एडुल्जी हे क्रिकेटपटू उपस्थित होते. तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप यांच्यासह प्रा. रत्नाकर शेट्टी यांनीही रेगे यांना आदरांजली वाहिली.