सावर्डे, दापूर, सावरखूटच्या गावकऱ्यांना मिंधे सरकारने मृत्यूच्या दाढेत ढकलले; मध्य वैतरणा धरणावर आदिवासींची धरणे

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरणमंत्री असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोखाडा तालुक्यातील दापूरमध्ये नदीपात्रावर तात्पुरता लोखंडी पूल उभारला. त्यामुळे स्थानिक आदिवासींना मोठा दिलासा मिळाला. मात्र सरकार बदलल्यानंतर त्याठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्याबाबतचा प्रस्ताव अजूनही बांधकाम विभागाने राज्य सरकारला पाठवलेला नाही. त्यामुळे सावर्डे, दापूर व सावरखूटवासीयांना मिंधे सरकारने मृत्यूच्या दाढेत ढकलले आहे.

त्याच्या निषेधार्थ आज आदिवासींनी मध्य वैतरणा धरणावर ठिय्या आंदोलन छेडले. सावर्डे येथे शहापूर व मोखाडा तालुक्याला जोडणारा 80 मीटर लांबीचा मजबूत पूल उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षणदेखील करण्यात आले. पण लालफितीच्या कारभारामुळे पुढे काहीच झाले नाही. या पुलासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येथील रहिवाशांना वैतरणा नदीपलीकडे जाण्यासाठी पक्का पूल नाही. आज अखेर ग्रामस्थांच्या संतापाचा भडका उडाला असून त्यांनी मध्य वैतरणा धरणाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला 45 दिवसांचा कालावधी द्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असून तसेच लेखी आश्वासन दिले आहे.