वाल्ह्याजवळ पालखी मैदानावरील झाडे भस्मसात, खोडसाळपणातून गवताला आग; झाडांना झळ

पुरंदर तालुक्यातील वाल्हेनजीक सुकलवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानातील गवताला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने या आगीत पालखी मैदानातील जवळपास 35 डौलदार झाडे भस्मसात झाली आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम येथील भव्य पालखी मैदानात होत असतो.

या पालखी मैदान परिसरात आळंदी देवस्थान सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची देवराई संस्था, तसेच बाणेर येथील वसुंधरा अभियान, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व उद्योजक राहुल यादव मित्र परिवार यांच्या वतीने जवळपास 400-450 प्रकारची झाडे लावण्यात आली होती. पालखीतळ हरित करण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब जांभूळ, करंज, आपटा, गुलमोहर आदी प्रकारची झाडे मोठ्या प्रमाणावर लावण्यात आली आहेत.

पालखी मैदानातील गवताल्या अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने पालखी मैदानात असलेल्या डौलदार वृक्षांना या आगीची झळ बसली आहे.

मागील पाच वर्षांपासून पावसाळा संपल्यानंतर झाडांचे संगोपन करताना या झाडांना पाण्याची अडचण निर्माण झाली होती. यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांनी तोडगा काढून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दर गुरुवारी दोन टँकरच्या माध्यमातून झाडांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली होती.

ट्रस्टच्या माध्यमातून पाण्यासाठी दोन टँकर मागील पाच वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात आले असल्याने वाल्हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, व वृक्षसंवर्धन ग्रुपचे सदस्य, अमोल दुर्गाडे, महेश भुजबळ, संतोष दुर्गाडे, योगेश दुर्गाडे, पवन दुर्गाडे सागर दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, आकाश जगताप, सनी दुर्गाडे, मयुर भुजबळ, मयुरेश दुर्गाडे, करण खोमणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गंगावणे, मोतीराम भोसले तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे टँकरचालक सुरेश पवार, प्रवीण शिंदे आदी पालखी मैदानामधील झाडांना पाणी देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे येथील झाडे चांगल्या प्रकारे वाढत असून, मागील अनेक वर्षांपासून, ओसाड दिसत असलेल्या माळावर आता हिरवीगार झाडे आनंदाने डोलत आहेत.

मात्र, काही अज्ञात व्यक्तींकडून खोडसाळपणातून पालखी मैदानातील वाळलेल्या गवताला आग लावण्यात येत असल्याने येथील डौलदार वृक्षांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी वृक्ष संवर्धन ग्रुपकडून होत आहे.