
वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी कारने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाने भाविकांना मोठा दिलासा देत या मार्गावरील टोल प्लाझामध्ये टोल करात 80 टक्के कपात करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. कोर्टाच्या या आदेशामुळे भाविकांना केवळ 20 टक्के टोल आकारला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या दोन टोलनाक्यांवर 80 टक्के टोल करात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते बांधणीचे काम पूर्ण होईपर्यंत टोल करातील कपात सुरूच ठेवावी, असे जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर रोज राष्ट्रीय महामार्ग 44 वरून जाणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती ताशी रब्स्तान आणि न्यायमूर्ती एम ए चौधरी यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना एनएचएआयला लखनपूर आणि बन टोलनाक्यांवरील लोकांकडून केवळ 20 टक्के टोल वसूल करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग 44 वर 60 किलोमीटरच्या आत टोल प्लाझा उभारू नये, असे निर्देशही जम्मू-कश्मीर उच्च न्यायालयाने दिले आहेत.
जनहित याचिकेवर सुनावणी
सुगंधा साहनी यांनी राष्ट्रीय महामार्गावर 44 वर असलेल्या लखनपूर, थांडी खुई आणि बन प्लाझा येथील टोल वसुलीमध्ये सूट मिळावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. डिसेंबर 2021 पासून महामार्गाचे बांधकाम हे केवळ 60 ते 70 टक्के झाले आहे. बांधकाम पूर्ण होण्याआधीच टोल वसुली केली जात आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयात केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 80 टक्के टोल वसुली कपात करा, असे निर्देश दिले आहेत.