
गेट वे ऑफ इंडियापासून जेएनपीएपर्यंत आता फक्त 35 ते 40 मिनिटांत पोहोचता येणार आहे. त्यासाठी लवकरच दोन अत्याधुनिक स्पीड बोटी धावणार असून त्याची ट्रायल शुक्रवारी घेण्यात येणार आहे. या बोटी इको फ्रेंडली असून त्यासाठी 35 कोटी 89 लाख रुपयांची तरतूद जेएनपीएने केली आहे. या प्रवासामुळे जेएनपीएचे कामगार, एअरफोर्स, सीआयएसएफ आदींच्या कामगारांना मोठा फायदा होणार असून वेळदेखील वाचणार आहे.
गेट वे ते जेएनपीएदरम्यान धावणाऱ्या स्पीड बोटी या फायबरच्या आहेत. त्या बॅटऱ्यांवर चालणार असून माजगाव डॉकमध्ये त्याची निर्मिती केली आहे. शुक्रवारी होणारी ट्रायल यशस्वी झाल्यानंतर लगेच या प्रवासाला ग्रीन सिग्नल देण्यात येईल, अशी माहिती जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली. लाकडी बोटी या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नव्हत्या. त्यामुळे हलक्या वजनाच्या अत्याधुनिक फायबर बोटी बनवण्याचा निर्णय जेएनपीएने घेतला.
25 जणांची क्षमता
जेएनपीए-गेट वेदरम्यान धावणाऱ्या बोटींची क्षमता उन्हाळ्यात 20 ते 25 प्रवाशांची राहील. दर पावसाळ्यात 10 ते 12 प्रवासी प्रवास करू शकतील, यादृष्टीने बोटीची बांधणी केली आहे. फेब्रुवारीमध्येच या बोटी प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार होत्या. पण काही तांत्रिक अडचणींमुळे काहीसा विलंब झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.