विमानाने प्रवास करताना आता प्रवाशांना आपल्या सामानांची चिंता करण्याची गरज नाही. एअर इंडियाने रिअल टाइम बॅगेज ट्रकिंग सर्व्हिस सुरू केल्याने आता सामान हरवण्याची भीती राहणार नाही. टाटा समूहाच्या विमान कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि अॅपवर बॅगेज ट्रकिंग फीचर जोडले आहे. हरवलेल्या किंवा विलंबाने सामानाच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. बॅगेज ट्रकिंगसाठी रिअल-टाइम अपडेट्सअंतर्गत तुम्हाला चेक-इन बॅगविषयी सद्यस्थान, ट्रान्झिट स्थिती आणि बॅगेज आगमन तपशील याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल. यामध्ये सामानाच्या आगमनाची माहिती चेक-इन, सुरक्षा मंजुरी, विमान लोडिंग, लोडिंग ट्रान्सफर आणि बॅगेज क्लेम क्षेत्र यांसारख्या सर्व महत्त्वाच्या बॅगेज टच पॉइंटवर उपलब्ध असेल. ही सुविधा एअर इंडियाच्या वेबसाइटवर बुक अँड मॅनेज सेक्शनमधील ‘ट्रक युवर बॅग्ज’ टॅबअंतर्गतदेखील उपलब्ध आहे. विमान कंपनीच्या नवीन धोरणानुसार, आता कंपनीच्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये प्रवासी सर्वात कमी भाडय़ाच्या श्रेणीमध्ये केवळ 15 किलो सामान मोफत घेऊन जाऊ शकणार आहेत. यापूर्वी केबिनमध्ये 20 किलोग्रॅमपर्यंत सामान नेण्याची मर्यादा होती.