माहीमच्या शितलादेवी परिसरात वाहतूक पोलिसाकडून जोरदार वसुली सुरू आहे. नियमानुसार ई-चलान करण्याऐवजी तो वाहतूक पोलीस कर्मचारी सर्रास तोडपाणी करीत आहे. जशी दंडाची रक्कम त्या हिशेबाने तोडपाणीची रोकड घेऊन ते चालकांना सोडून देत आहे. विशेष म्हणजे वसुली करण्यासाठी तो पोलीस त्या परिसरात असलेल्या पेट्रोल पंपवाल्याची मदत घेत आहे.
नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, चालकासोबत कुठल्याही प्रकारे हुज्जत न घालता ई-चलान करण्याची भूमिका वाहतूक पोलिसांची आहे. त्यासाठी शासनाने वाहतूक पोलिसांना मशीनदेखील दिली आहे; पण तरीदेखील बहुतेक ठिकाणी पोलीस वैयक्तिक मोबाईलचा वापर फोटो काढण्यासाठी करताना दिसतात. माहीमच्या शितलादेवी परिसरात तर एक वाहतूक पोलीस बिनधास्त वसुली करत आहे. तुम्ही कोणालाही फोन करा, मी कायदेशीर कारवाई करणारच असे दरडावत तो पोलीस कर्मचारी बराच वेळ चालकाना उभे करून ठेवतो. मग हळूच 200, 500 रुपयांची तोडपाणी करून चालकांना सोडून देत आहे. चालकांच्या त्या वसुलीबाज पोलिसाविरोधात अनेक तक्रारी येत आहेत.
वसूल केलेली रक्कम थेट शर्टच्या आत
पद्धतशीर कारवाईची भीती दाखवत व नियमांवर बोट ठेवत तो वाहतूक पोलीस तोडपाणी म्हणून चालकाने दिलेले पैसे स्वीकारून तो थेट शर्टच्या आतमध्ये टाकतो. पोलीस कर्मचाऱयाच्या या वृत्तीमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मात्र डाग लागत आहे.
पैसे नसतील तर पेट्रोल पंपवाल्याला हात
रोख रक्कम नसेल तर तो पोलीस चालकांना तेथील पेट्रोल पंपावर पाठवतो. तेथे तोडपाणीची ठरलेली रक्कम ऑनलाइन करण्यास सांगतो. मग तेवढी रक्कम पेट्रोल पंपवाल्याकडून चालक घेऊन ते त्या पोलिसाला देतो. अशी वसुलीची सिस्टमच त्या पोलिसाने तेथे केली आहे. त्यातही त्या पोलिसाने हात दाखविल्यानंतरच पेट्रोल पंपवाला ऑनलाइन पेमेंट स्वीकारतो. विशेष म्हणजे, सीसीटीव्हीत आपण येणार नाही याची काळजीदेखील तो पोलीस घेत आहे. अशा खाबुगिरीला आळा बसावा अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.