एसटीच्या तोट्याला लाडक्या बहिणी जबाबदार, मंत्री सरनाईक यांचे विधान

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबवणाऱया महायुती सरकारला आता लाडक्या बहिणी नावडत्या होण्यास सुरुवात झाली आहे. वास्तविक ढिसाळ कारभारामुळे एसटी तोटय़ात गेली आहे, पण त्याचे खापर सरकारने महिलांवर फोडले आहे. महिलांना तिकीट भाड्यात पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे एसटी तोटय़ात गेली, असे विधान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केले. महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली. यामुळे एसटीला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होतो. एसटीच्या ताफ्यातील 60 टक्के बस भंगार झाल्या आहेत. भाडेवाढ केल्यामुळे एसटीचा तोटा कमी झाला. एसटी सुरळीत व्हायला दोन ते तीन वर्षे लागतील, असे ते म्हणाले.