एका 66 वर्षीय वृद्धाच्या हॉटेल मालकी हक्काबाबत लघुवाद न्यायालयात दाखल दाव्याचा निकाल बाजूने देण्यासाठी त्यांच्याकडे 25 लाखांची मागणी करून तेवढी रोकड घेताना लघुवाद न्यायालयात नेमणुकीस असलेला अनुवादक दुभाषिक विशाल सावंत (43) यांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
दिगंबर (नाव बदललेले, 66) यांच्या हॉटेल मालकी हक्काबाबत लघुवाद न्यायालयात दावा दाखल असून त्या प्रकरणाचा निकाल अंतिम टप्प्यात प्रलंबित होता. त्या दाव्याचा निकाल तुमच्या बाजूने देतो असे सांगत अनुवादक दुभाषिक असलेल्या विशाल सावंत याने 25 लाखांची मागणी केली. पण लाच द्यायची नसल्याने दिगंबर यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे सावंत यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आज अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तक्रारीची खातरजमा केली असता सावंत यांनी 25 लाखांची मागणी केल्याचे आढळून आले. त्यानुसार तत्काळ पथकाने सापळा रचून एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दील एका हॉटेलात 25 लाख दिगंबर यांच्याकडून घेताना विशाल सांवत यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सावंत यांना अटक करण्यात आली.