
मध्य प्रदेशातील उज्जैनच्या शिवपुरा स्थानकाजवळ बीकानेर-बिलासपूर एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ट्रेनमधून धूर येऊ लागला आणि स्फोटांचा मोठा आवाज झाला. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ट्रेन थांबताच जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या. ट्रेनच्या जनरेटर कोचमध्ये आग लागली होती. ट्रेन गार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली.
जनरेटर कोचमधील वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागताच जनरेटरमध्ये मोठे स्फोट झाले आणि धूर येऊ लागला. प्रवाशांनी धूर निघताना आणि स्फोटाचा आवाज ऐकताच एकच गोंधळ उडाला. सुमारे दीड तास ही गोंधळाची परिस्थिती होती.
गार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राच्या मदतीने आगीवर थोडे नियंत्रण मिळवले. त्यानंतर जनरेटर कोच इतर कोचपासून वेगळे केला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.