Train Accident – झारखंडमध्ये दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्या, भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

झारखंडमधील बरहैटमध्ये मोठी दुर्घटना घडली असून दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी (01-04-2025) पहाटे 3.30 च्या दरम्यान हा अपघात झाला आहे. दोन्ही गाड्या एकाच पटरीवर आल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरक्काहून लालमटियाच्या दिशेने जाणारी एक मालगाडी बरहैट येथे उभी होती. याच दरम्यान लालमटियाहून NTPC चा कोळसा घेऊन जाणारी दुसरी मालगाडी याच पटरीवर आली आणि मोठा अपघात झाला. या भयंकर अपघातात दोन्ही गाड्यांच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले असून आग लागली होती. अपघातानंतर तत्काळ अग्निशम दलाला माहिती देण्यात आली. शर्तीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे, तसेच दुसऱ्या व्यक्तीला मृतदेह इंजिनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रेल्वे रुळावर अपघात झाल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे लाईन पुर्ववत करण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. तसेच घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.