इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमानात फ्रॉडचे प्रकारही वाढत आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासाठी लोकांच्या स्मार्टफोनचा ऍक्सेस मिळवण्यासाठी ओटीपीचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक वेळा लोकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ट्रायने अलीकडेच लोकांना फसवणूक आणि ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी काही निर्देश लागू केले आहेत. नवीन नियमांमुळे ग्राहकांना ओटीपी येण्यास थोडा विलंब होऊ शकतो. ट्रायचे हे पाऊल ग्राहकांना बनावट कॉल आणि संदेशांपासून वाचवण्यासाठी एक मोठा प्रयत्न आहे.
ट्रायने गेल्या काही महिन्यांत फसव्या कॉल्स आणि मेसेजला सामोरे जाण्यासाठी तसेच ग्राहकांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ट्रायचा हा नियम डिजिटल फसवणूक कमी करण्यासाठी आणि सुरक्षित मेसेजिंग सिस्टम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो.
प्रक्रियेस विलंब
30 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीनंतर कंपन्यांना संदेश ट्रेसिबिलिटी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
1 डिसेंबरपासून मार्गदर्शनाचे पालन न करणाऱया व्यवसायांचे संदेश ब्लॉक केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त ट्रेसिबिलिटी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे 1 डिसेंबरपासून ओटीपी प्राप्त करण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.
आज मुदत संपणार
या ट्रेसिबिलिटी प्रक्रियांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र एअरटेल, जिओसह तीन मोठय़ा कंपन्यांच्या विनंतीवरून ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.