झाशीतील रुग्णालयात आग; दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू,  वैद्यकीय महाविद्यालयात कुटुंबीयांनी घातला गोंधळ

झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या नवजात बालकांच्या आई-वडिलांनी रुग्णालयाबाहेर टाहो फोडल्याने काळीज पिळवटून टाकणारे दृश्य पाहून देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या प्रशासनावरही सडकून टीका होत आहे. दरम्यान, 12 तास उलटून गेले तरी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी गोंधळ घालत जबरदस्तीने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशमधील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयातील न्यू बॉर्न केअर विभागात शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या विभागात असलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. बघता बघता ही आग पसरली. वॉर्डबॉयने आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्राचा वापर केला. मात्र त्याची मुदत चार वर्षांपूर्वीच संपली होती, त्यामुळे ते चालूच झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ा दाखल झाल्या. खिडकी तोडून पाणी फवारण्यात आले. दोन तासांनी आग आटोक्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेचा सखोल तपास करण्यासाठी तीन उच्चपदस्थ अधिकाऱयांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिली.

44 बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

न्यू बॉर्न केअर विभागात एकूण 54 बालकांना ठेवण्यात आले होते. त्यातील दहा मुलांचा होरपळून मृत्यू झाला. मृत नवजात बालकांपैकी तिघांची ओळख पटलेली नाही. ओळख पटवण्यासाठी त्यांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. प्रशासनाने एकूण 44 बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून या दुर्घटनेतील 16 बालकांवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.