उड्डाणपुलावरून खाली समुद्रात पडून ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू, टेम्पोचा पाठलाग करताना दुचाकीवरल नियंत्रण सुटले

टेम्पोचा पाठलाग करताना उड्डाणपुलावरील एका वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅफिक वॉर्डन वरून समुद्रात पडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना धर्मवीर संभाजीराजे कोस्टल मार्गावर घडली. रफिक शेख (39) असे त्या वॉर्डनचे नाव होते.

रफिक हा टाटा गार्डनसमोरील धर्मवारी संभाजीराजे कोस्टल रोड येथे ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करत होता. कोस्टल रोडवरून एक टेम्पो टाटा गार्डन ते वरळी असा निघून गेला. त्यामुळे त्या टेम्पोला अडविण्यासाठी रफिक दुचाकीवरून मागे गेला. टेम्पोचा दुचाकीवरून पाठलाग करत असताना कोस्टल रोडवरील वळणदार उड्डाणपुलावरील एका वळणावर रफिकचे गाडीवरील नियंत्रण सुटले. परिणामी तो पुलावरील सिमेंटच्या कठड्यावर आदळून वरून खाली समुद्रात पडला. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानाने घटनास्थळी धाव घेऊन रफिकला बाहेर काढले व नायर इस्पितळात नेले, मात्र तेथे त्याला दाखलपूर्व मृत घोषित करण्यात आले.