गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) आज दिमाखात सांगता झाली. ‘टॉक्सिक’ या लिथुआनियन चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार तर रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांनी ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार पटकावला. यंदा 12 आंतरराष्ट्रीय आणि तीन हिंदुस्थानी चित्रपटांसह 15 चित्रपट सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी स्पर्धेत होते.
55 व्या इफ्फी महोत्सवात क्लिमेंट फाव्यू यांना ‘होली काऊ’ या फ्रेंच चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळवला. ‘टॉक्सिक’साठी वेस्टा मातुलिते आणि इवा रुपीकेट यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ या रोमानियन चित्रपटासाठी बोगदान मुरेसानू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना गौरविण्यात आले. सारा फ्रिडलँड यांना ‘फॅमिलियर टच’ या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरविले. ऑस्ट्रेलियातील चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा त्यांच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल ‘सत्यजीत रे जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
‘लंपन’, ‘घरत गणपती’लाही पुरस्कार
इफ्फी चित्रपट महोत्सवात नवज्योत बांदिवडेकर यांनी ‘घरत गणपती’साठी हिंदुस्थानी चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हा पुरस्कार पटकावला. युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने यंदाच्या वर्षीपासून हा पुरस्कार नव्याने सुरू केला आहे. प्रकाश नारायण संत यांच्या कथांवर आधारित निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ या मराठी वेब सीरिजला सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) पुरस्कार मिळाला आहे.