थर्टी फस्टसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती, तळीरामांनी पार्ट्यांचे बेत आखले

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी अनेकांनी बेत आखून पिकनिक स्पॉटची निवड केली आहे. तळीरामांनी खास पार्ट्यांचे आयोजन केले आहे. उद्या मंगळवार असल्याने अनेकांनी सेलिब्रेशनसाठी रात्री 12 वाजल्यानंतरचा मुहूर्त निवडला आहे.

2024 वर्षाला उद्या निरोप देताना फटाक्यांच्या आतषबाजीत 2025 या नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे. गोव्या पेक्षा पर्यटकांनी थर्टी फस्टसाठी कोकणाची निवड केली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. किनारपट्टीवरील हॉटेल, लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. हॉटेल पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध पॅकेज जाहीर केली आहे. काही ठिकाणी थर्टी फस्ट सेलिब्रेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तळीरामांनी पार्ट्यांचे बेत आखले

थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून त्याठिकाणी ब्रिथ ॲनालायझरने वाहन चालकांची तपासणी होणार आहे. दारू पिऊन वाहन चालवताना कुणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची गस्त सुरू रहाणार असून परवाना न घेता ज्याठिकाणी मद्यपानाच्या पार्ट्या होत असतील तिथे भरारी पथके धाड टाकून कारवाई करणार आहेत.