चंद्रपूरच्या बोटनिकल गार्डनमध्ये पर्यटकांच्या गाडीला अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद

चंद्रपुरात बोटनिकल गार्डनमध्ये पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात गार्डनमधील सुरक्षारक्षकासह तीन जण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेनंतर चालकाला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत सखोल तपास सुरू आहे.

 

चंद्रपुरात अलिकडेच बोटनिकल गार्डन सुरू झाले आहे. सध्या हे गार्डन पर्यटकांचे विशेष आकर्षण बनले आहे. त्यामुळे पर्यटकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गार्डनचे क्षेत्र मोठे असल्याने पर्यटकांना फिरवण्यासाठी वन विभागाने इलेक्ट्रिक वाहनांची देखील सोय केली आहे.

अशाच एका वाहनातून काही पर्यटक गार्डन फिरायला निघाले होते. यावेळी गाडी अनियंत्रित झाली आणि गेटला धडकली. या धडकेत वाहनाचा चुराडा झाला, तर सुरक्षासरक्षकासह तीन जण जखमी झाले. हा अपघात वाहनातील दोषामुळे झाला की चालकाच्या चुकीमुळे याबाबत तपास सुरू आहे.