सांगलीतील पर्यटनस्थळांना हवा निधीचा बूस्टर

जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा, कृष्णा-वारणा नदीकाठ याबरोबर ऐतिहासिक वारसा असणारी धार्मिक स्थळे आणि गड-किल्ले अशा विविधतेने नटलेल्या जिल्ह्याला पर्यटनवाढीला मोठा वाव असून, सांगली जिल्ह्यात पन्नासहून अधिक पर्यटनस्थळे आहेत. पण गेल्या दहा वर्षांत या पर्यटनस्थळांना भरघोस निधी मिळालेला नाही. त्यामुळे अनेक स्थळे विकसित झाली नाहीत. राज्य व केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना निधीचा बूस्टर देणे आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारचा अकार्यक्षम कारभार कारणीभूत ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा गेल्या दहा वर्षांत आवश्यक तितका विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे ही पर्यटनस्थळे आहे तशीच दिसत आहेत. सह्याद्री पर्वतरांगेचा झालेला स्पर्श, जैवविविधतेने समृद्ध असलेले जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, वारमाही वाहणाऱ्या नद्या, नद्यांची संगमस्थळे या माध्यमातून निसर्गाने मुक्तपणे दिलेले दान तसेच साहित्यिक, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला आहे. हा वारसा जपण्यासाठी आता राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात चांदोली धरण व अभयारण्य आहे. या उद्यानाला 2004 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते. दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो. त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे. वन्यप्राण्यांच्या गणनेत, चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह 25 बिबट्यांचा वावर असल्याचे ठशांवरून निदर्शनास आले आहे, तर 350 ते 400 च्या दरम्यान गवे, 250 ते 300 सांबरे, 100 अस्वले यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत. या अभयारण्यला राज्य व केंद्र