पालघर, कसाऱ्यात सापडले सवासहा कोटींचे घबाड

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि कसाऱ्यात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत तब्बल सवासहा कोटींचे घबाड सापडले आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात येत असलेल्या एका व्हॅनला पोलिसांनी तपासणीसाठी अडवले. यावेळी गाडीत 4 कोटी 25 लाख रुपयांची रोकड असल्याचे लक्षात आले.

दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर एका बँकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत ही रक्कम बँकेची असल्याचा दावा केला आहे. मात्र बँकेची गाडी असतानादेखील युनिफॉर्मवरील शस्त्रधारी गार्ड नसल्याने पोलिसांनी संशय व्यक्त केला असून कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याचे समजते.

तसेच कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ आज सकाळी नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या (एएच-11-बीव्ही-9709) कारची तपासणी केली असता त्यात जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम भरारी पथकाला आढळून आली आहे.