खुशखबर! मध्यमवर्गाचे स्वप्न साकार होणार, मुंबईत वर्षभरात म्हाडाची 5 हजार 199 घरांची लॉटरी

म्हाडाच्या 2025-2026 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत 19,497 घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून अर्थसंकल्पात 9202.76 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात 5199 तर कोकण मंडळाअंतर्गत 9902 घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अनुक्रमे 5749.49 आणि 1408.85 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, मात्र मुंबई वगळता अन्य शहरांतील म्हाडाच्या घरांना अर्जदारांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. राज्यभरात म्हाडाची 11 हजारांहून अधिक घरे धूळ खात पडली असून त्यातील सर्वाधिक घरे कोकण मंडळात आहेत. असे असतानाही कोकण मंडळात इतकी घरे बांधण्याचा घाट का घातला जातोय, असा सवाल उपस्थित होतोय.

म्हाडाचा 2024-25 चा सुधारित व 2025-2026 चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या 2025-2026 च्या 15956.92 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व 2024-25 च्या 10901.07 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार, पुणे मंडळाअंतर्गत 1836, नागपूर मंडळाअंतर्गत 692, छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत 1608, नाशिक मंडळाअंतर्गत 91, अमरावती मंडळाअंतर्गत 169 घरे उभारण्यात येणार आहेत. चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी 371.20 कोटी रुपये, टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी 350 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

धूळ खात पडलेल्या घरांवर उधळपट्टी

विरार बोळींज येथील धूळ खात पडलेली घरे विकली जावीत यासाठी आता 33.85 कोटी रुपये खर्च करून तिथे क्लब हाऊस, जलतरण तलाव अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी 115 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे धूळ खात पडलेल्या घरांवर इतकी उधळपट्टी का, असा सवाल उपस्थित होतोय. पाचपाखाडी ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केअर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी 15 कोटी रुपये, माजिवाडे-ठाणे विवेकानंद नगर येथे 100 बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहाच्या उभारणीसाठी 30 कोटी रुपये, वर्तकनगर-ठाणे पोलीस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी 90 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गेली अनेक वर्षे हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांची म्हाडाने घोर निराशा केली असून अर्थसंकल्पात गिरणी कामगारांच्या घरासाठी केवळ 57.50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय बोरिवली सर्व्हे क्र. 160 वरील योजनेसाठी 200 कोटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी 200 कोटी, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी 177.79 कोटी, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी 50 कोटी, मागाठाणे बोरिवली योजनेसाठी 85 कोटी, एक्सर बोरिवली तटरक्षक दल योजनेसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला वेग

मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी 573 कोटी रुपये, परळच्या जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद आहे.