टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने युक्रेन नागरिक आरमेन गरून अटाईन (48) या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे. फसवणूक करून हिंदुस्थानबाहेर पसार झालेल्या युक्रेन आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईनने मदत केली होती.
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला आणि पोलिसांना गुंगारा देत लपून राहणारा तौसिफ रियाज ऊर्फ जॉन कारटर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी लोणावळा येथून पकडले. तौसिफच्या चौकशीत युव्रेन नागरिक अटाईन याचे नाव समोर आले. मग पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अटाईन याने काही सिनेमांमध्ये छोटे मोठे काम केले असून तो फिल्मसिटीत असतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फिल्मसिटीत जाऊन चौकशी केली तेव्हा त्याचे खरे नाव व फोन नंबर पोलिसांना मिळाला. त्याआधारे पोलिसांनी अटाईन मीटिंगसाठी येताच त्याला ताब्यात घेतले. त्याला आज न्यायालयात हजर केले असता 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.