Torress Scam – टोरेस घोटाळ्याप्रकरणी संचालक सर्वेश सुर्वेसह तीन जणांना अटक

टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, तानिया वॅसातोवा, स्टोर मॅनेजर वॅलेन्टीना कुमार अशी त्या तिघांची नावे आहेत.

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टोरेस ब्रँड चालवणाऱया प्लॅटिनम हर्न प्रा.लि. कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे यांच्यासह, सीईओ व जनरल मॅनेजर अशा पाच जणांविरोधात बीएनएसच्या कलम 318 (4), 316 (5), 61 सह एमपी आयडी कायदा कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चांगला परतावा मिळावा म्हणून अनेक सामान्य नागरिकांनी टोरेस या कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र अचानक परतावा मिळणे बंद झाले. त्यामुळे तणावाखाली आलेल्या गुतंवणूकदारांनी कंपनीच्या मुंबईतील दादर, मीरा भाईंदर, नवी मुंबईतील कार्यालयंबाहेर सोमवारी गर्दी केली होती.

आठवड्याला 10 टक्के परतावा

कंपनी आठवडय़ाला 10 टक्के परतावा देत असे; पण गेल्या 2 दिवसांपासून कंपनीकडून काहीच माहिती मिळत नसल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले. कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेकांच्या छातीत अक्षरशः कळ गेली. अनेकांच्या घरात वादावादी झाली, तर अनेकजण प्रचंड तणावाखाली आले असे अनुभव अनेक गुंतवणूकदारांनी सांगितले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात कंपनीतील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर येथील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमल्याने खबरदारी म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.