झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांचा घात, ‘टोरेस’चा 11 महिन्यांमध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तब्बल 3 लाख मुंबईकरांचा घात झाला आहे. टोरेस या कंपनीने गेल्या 11 महिन्यांत तब्बल 3 हजार कोटींचा घोटाळा केला असून गुंतवणूकदारांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. खात्यात परतावा येणे बंद झाल्यामुळे कंपनीच्या दादर, कांदिवली, सानपाडा, मीरा-भाईंदर आणि कल्याण येथील शाखांबाहेर आजही संतप्त गुंतवणूकदारांची गर्दी दिसली. या सर्वच शाखा बंदच आहेत. दरम्यान, पोलिसांनी कंपनीचा संचालक सर्वेश सुर्वे, उझबेकिस्तानी जनरल मॅनेजर तानिया पॅसातोवा आणि रशियन स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटीना कुमार या तिघांना आज अटक केली. तिघेही परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते.

प्रदीप कुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून प्लॅटिनम हर्न प्रा.लि. कंपनी व कंपनीचा संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ ऊर्फ जॉन कारटर तसेच कंपनीची महाव्यवस्थापक तानिया पॅसातोवा व कंपनीची स्टोअर मॅनेजर मूळची रशियन व्हॅलेंटीना कुमार यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघे गाशा गुंडाळून पसार होण्याच्या तयारीत होते परंतु, पोलिसांनी वेळीच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 13 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या कंपनीच्या दादर येथील कार्यालयाचे पुढील महिन्यात अॅग्रीमेंट संपणार होते. त्याआधीच 3 हजार कोटींची फसवणूक करून कंपनीचा मालक आणि व्यवस्थापनातील अनेक अधिकाऱयांनी पळ काढला.

गुंतवणूकीच्या बदल्यात बनावट खडा

गुंतवणूक करताना भरलेल्या रकमेच्या बदल्यात काहींना मोझोनाईट खडा मिळाला. हा खडा आकर्षक असल्याने गुंतवणूकदारांना संशय आला नाही. परंतु, तो बनावट असल्याचे आता समोर आल्याचे काही गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांनी दादर पोलीस स्थानकात तक्रारीचा अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. टोरेस कंपनी बनावट दागिने विकत असल्याची गुंतवणूकदारांना कल्पना होती. मात्र चांगले व्याज मिळत असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांनी याकडे कानाडोळा केला. अवघ्या 4 हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर 6 टक्के आणि सहा लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास 11 टक्के व्याज कंपनी देत होती. कंपनीने 3 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईत कार्यालय सुरू केले.

मालक देश सोडून पळाल्याचा संशय

दादर येथील टोरेसच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीचा मालक देशाबाहेर पळून गेल्याची भीती व्यक्त केली. 30 डिसेंबरनंतर एकही रुपया मिळाला नसल्याने गुंतवणूकदार संभ्रम अवस्थेत आहेत. तर काही गुंतवणूकदारांना अजूनही आपले पैसे मिळतील आणि पैसे सुरक्षितच आहेत अशी आशा व्यक्त केली.

संस्थापकाच्या शोधासाठी पथके… लूक आऊट नोटीस जारी

कंपनीचा संस्थापक, संचालक आणि सीईओच्या शोधासाठी पोलीस पथके तयार केली आहेत. आरोपींविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. सीईओ तौफिक शेख व सीए अभिषेक गुप्ता दोघेही देशातच आहेत.

भाजी विक्रेत्याचे 4 कोटी बुडाले

दादरमधील प्रदीप कुमार वैश्य या भाजी विक्रेत्याचे 4 कोटी 27 हजार रुपये बुडाले आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून मी पैसे टाकले. 6 लाख 70 रुपये परतावा मिळाल्याने विश्वास वाटला. मग गुंतवणूक वाढवण्यासाठी इतरांचेही पैसे गुंतवले. यासाठी घर गहाण ठेवले, कर्ज घेतले, अनेकांकडून पैसे गोळा केले. माझ्या सल्ल्यानुसार परिचयातील लोकांनीही पाच ते सहा कोटी गुंतवले. आठवडय़ाला पैसे मिळत होते, पण अचानक दोन आठवडय़ांपासून पैसे येणे बंद झाले, असे वैश्य यांनी सांगितले.