परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे भातपिकांची अक्षरशः नासाडी झाल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. भातपीक कापणीला आल्यानंतर धो धो पाऊस पडल्याने शेतात अक्षरशः चिखल झाला असून भातपिकांची माती झाली आहे. तालुक्यात सुमारे 14 हजार हेक्टर क्षेत्रात पिकवल्या जाणाऱ्या भातपिकांची नासाडी झाली आहे. सुमारे 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शहापूर तालुक्यात किमान 22 हजार शेतकऱ्यांकडून भातपिकांची लागवड केली जाते. यावर्षीच्या आतापर्यंत उत्तम झालेल्या पावसामुळे व शेतकऱ्यांचे कठोर मेहनतीमुळे भातपीक अगदी सोन्यासारखे बहरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. कठोर परिश्रमानंतर शेतात उगवलेल्या सोन्यासारख्या पिकांमुळे द्विगुणित झालेल्या आनंदावर पावसाने विरजण टाकून शेतकऱ्यांची झोपच उडवली आहे.
नुकसानभरपाई द्या ! मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतांना तळ्यांचे
स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे कापणीला आलेले पीक कुजून चालले आहे. शेतात कापून ठेवलेला भात आता पाण्यावर तरंगू लागला आहे. तालुक्यातील अंदाड, बिरवाडी येथील हरेश मोगरे, सुखदेव मोगरे, जनार्दन भेरे, प्रवीण भेरे, दिलीप भेरे, शांताराम चौधरी यांसह तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी अशी मागणी कृषी विभागाकडे केली आहे.
जव्हारमधील गर्वे भातही आडवे
परतीच्या पावसाने जव्हारमधील शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. कारण तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी हळवे व गर्वे बियाणे पेरले होते. दसऱ्यानंतर या हळवा भातपीक कापणीला सुरुवात होते. मात्र धुवांधार पावसामुळे शेतात पाणी साचून भाताचे पीक ओले झाले असून कापणीला आलेला गर्वे भात शेतातच आडवा झाला आहे.
1. शहापूर तालुक्यात किमान 80 टक्के भातपिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2. शिरोळ परिसरातील करंजपाडा, वारलीपाडा येथील आठ घरांची पडझड झाली आहे. अनेक घरांवरील कौले उडून गेली आहेत.
3. विक्रमगड तालुक्यातही भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी सुरेश पालवी या शेतकऱ्याने केली आहे.