शतक महोत्सवी वर्षात संघांचीही शंभरी, मावळी मंडळाच्या कबड्डी स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ

कबड्डीचे दिमाखदार आणि दर्जेदार आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा कबड्डीचा चढाई-पकडींचा थरार रंगणार आहे. मावळीची 72 वी राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गटाची कबड्डी स्पर्धा येत्या 25 ते 29 एप्रिलदरम्यान ठाण्यात आयोजित केली जाणार असून यात पुरुष गटात 68 आणि महिला गटात 32 अशा शंभर संघांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत विजेत्यांवर पाच लाख रुपयांच्या रोख पुरस्कारांचा दिला जाणार असल्याची माहिती मावळी मंडळाने दिली.

मावळी मंडळ म्हणजे कबड्डी हे समीकरण महाराष्ट्राच्या सर्वच कबड्डीप्रेमींच्या परिचयाचे आहे. कबड्डीला आपुलकी आणि प्रेम देणाऱया मावळी मंडळाच्या स्पर्धेत सहभागी होणे, हे प्रत्येक कबड्डी संघाचे स्वप्न असते. ते स्वप्न पुन्हा एकदा साकार करण्यासाठी राज्यभरातील 70 पेक्षा अधिक संघ लाल मातीत आपला खेळ दाखवणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह दिनेश मोरे यांनी दिली. मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष असल्यामुळे यंदा पुरुष गटातील विजेत्याला लखपती केले जाणार आहे. स्पर्धेचा उपविजेता पाऊण लाखांचा मानकरी ठरेल. महिला गटाच्या विजेत्या 55 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाईल.

या स्पर्धेत पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे , मुंबई उपनगर , मुंबई शहर या जिह्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला आहे. गतवर्षी पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने तर महिला गटात शिवशक्ती महिला संघाने बाजी मारली होती. या स्पर्धेत पुरुष गटात गतविजेते स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर), सतेज संघ (बाणेर), श्री शिवाजी उदय मंडळ , बदामी हौद संघ (सर्व पुणे), बाल मित्र मंडळ (पालघर), टीआयपीएल क्लब (रायगड), जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद, शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण, ग्रीफिन्स जिमखाना नवी मुंबई (सर्व ठाणे), स्वस्तिक क्रीडा मंडळ, पार्ले स्पोर्ट्स क्लब, जय भवानी तरुण मंडळ (सर्व मुंबई उपनगर), बंडय़ा मारुती सेवा मंडळ,अंपुर स्पोर्ट्स क्लब, शिवनेरी सेवा मंडळ, अमर हिंद मंडळ, गुडमार्ंनग स्पोर्ट्स क्लब (सर्व मुंबई शहर) या बलाढय़ संघांचा समावेश आहे.