
जुलै महिन्यात भाज्याचे दर वाढलेले पाहायला मिळत असून ग्राहकांच्या खिशाला मात्र यामुळे महागाईची फोडणी बसली आहे. हॉटेलच्या चवीसारख्या भाज्या बनवण्यासाठी टोमॅटोचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र या टोमॅटोचे दर काही ठिकाणी शंभरीच्या पार गेले असून सर्वसाधारण बाजारात 100 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. ग्राहकांना या दर वाढीचा फटका बसत आहे. सर्वसाधारणपणे 100 रुपये किलोवर पोहोचलेल्या टोमॅटोमुळे अनेक ग्राहकांना त्याकडे पाठ फिरवावी लागत आहे.
टोमॅटो का महागला?
जुलै महिन्याच्या शेवटाकडे टोमॅटो महागल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आकडेवारी जारी केली असून 27 जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोची किरकोळ किंमत 77 रुपये प्रति किलो होती. मात्र टोमॅटोचे दर गुणवत्तेनुसार आणि विक्रीच्या ठिकाणानुसार थोड्याफार प्रमाणात बदलतात. त्यामुळे काही भागात दर 80 रुपये किलो, काही भागात हाच दर 100 रुपये पेक्षा जास्त झाल्याचं कळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, नद्यांना पूर आला यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पावसामुळे काही भागात टोमॅटो सडला आहे. तर पुरवठा वेळेवर न झाल्याने दिल्ली एनसीआरमध्ये टोमॅटोचा अक्षरश: तुटवडा निर्माण झाला आहे. या सगळ्याचा परिणाम टोमॅटोच्या दरांवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून अन्य भाज्यांचे दर देखील गगनावर पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. 100 रुपयांना मिळणारी ब्रोकोली 400 रुपये किलोने मिळत आहे, तर कोथिंबिरीची जुडीही 40 रुपयांवर गेली आहे. शिमला मिर्चीही तब्बल 200 रुपये किलोने मिळत आहे, तर 120 रुपये किलोने मिळणारे आले आता 200 रुपये किलोवर गेले आहे.