पदकांची दुप्पट आशा, 117 खेळाडू आणि मिशन 15 मेडल; हिंदुस्थानी खेळाडू महापराक्रमासाठी सज्ज

टोकियोत 124 खेळाडूंच्या विक्रमी पथकाने सात पदकांची कमाई केली तेव्हा अवघ्या हिंदुस्थानात जल्लोष झाला होता. आताही हिंदुस्थानचे 117 खेळाडूंचे महापथक पॅरिस गाठणार असून या क्रीडा पुंभमेळय़ात पदकांची दुप्पट आशा डोळय़ांपुढे ठेवली आहे. तगडे खेळाडू आणि त्यांची वर्तमान कामगिरी पाहाता हिंदुस्थान पॅरिस गाजवणार हे निश्चित आहे.

टोकियोपेक्षा पॅरिस ऑलिम्पिकला जाणारे हिंदुस्थानचे पथक संख्येत सातने कमी असले तरी पथकातील खेळाडूंची ताकद दुपटीने वाढलीय. गेल्या वेळी अॅथलेटिक्सच्या भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने सुवर्ण इतिहास लिहिला होता. यावेळीही तो हिंदुस्थानचे प्रमुख आशास्थान असून सुवर्ण राखण्याचा इतिहास घडवण्यासाठी त्याचा भाला सज्ज झाला आहे. हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंपैकी सर्वाधिक 29 खेळाडू हे एकटय़ा अॅथलेटिक्समध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. यात 11 महिला आणि 18 पुरुष खेळाडू आहेत. त्यापैकी अविनाश साबळे, पारुल चौधरी, 4 बाय 400 मीटरची रिले शर्यत हिंदुस्थानला पदकांची संस्मरणीय भेट मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत.

नेमबाजांचा सर्वाधिक पदकांवर निशाणा

अभिनव बिंद्रापासून सुरू झालेला हिंदुस्थानी नेमबाजांनाचा पदकांवरील निशाणा प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपली कामगिरी उंचावतच चालला आहे. या स्पर्धेतही हिंदुस्थानला सर्वाधिक पदके जिंकून देण्याची जबाबदारी नेमबाजांच्याच खांद्यावर आहे. त्यासाठी तब्बल 21 नेमबाज आपली बंदूक घेऊन पदकांवर निशाणा साधतील. संदीप सिंह, ऐश्वर्य तोमर, स्वप्नील कुसळे, अर्जुन चिमा, मनू भाकर, सिफ्ट काwर, रिदम संगवानसारख्या नेमबाजांनी केलेली प्रचंड मेहनत पॅरिसमध्ये रंगत आणणार. टोकियोत नेमबाजांनी तीन पदके जिंकली होती, तो आकडा नक्कीच वाढेल, अशी अपेक्षा आहे.

बॅडमिंटनमधेही इतिहास घडणार

बॅडमिंटनही हिंदुस्थानच्या पदक संख्येत वाढ करणारा खेळ झाला आहे. पी. व्ही. सिंधूला गतवेळी रौप्यपदक मिळाले होते. यावेळी तिचा खेळ निश्चित खालावला असला तरी पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी सोनेरी कामगिरी करण्यासाठी हातात रॅकेट घेऊन सज्ज आहेत. पॅरिसमध्ये ‘जन गण मन’चे सूरच ऐकविणार हेच त्यांचे पहिले आणि शेवटचे ध्येय आहे. एच.एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेनही पदकांवर लक्ष्य केंिद्रत करून आहेत. बॅडमिंटनमधून नक्की गूड न्यूज मिळेल, अशी आशा आहे.

कुस्ती, मुष्टियुद्धातही पदकांचे ध्येय

हिंदुस्थानची ताकद कुस्ती आणि मुष्टियुद्ध या खेळातही दिसणार आहे. या दोन्ही खेळातील वादामुळे खेळाडूंच्या तयारीवर परिणाम निश्चितच झाला आहे, पण खेळाडू आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज झाले आहे. कुस्तीतील सारे वाद एकाच वेळी चव्हाटय़ावर आल्यामुळे अवघ्या जगात हिंदुस्थानची प्रतिमा डागाळली गेली आहे. मात्र हे खेळाडू आपल्या खेळाने कुस्तीला आली स्फूर्ती हे अवघ्या जगाला दाखवून देतील, असा विश्वास आहे. मुष्टियुद्धही सध्या संघटनात्मक संकटात आहे. मात्र निकहत झरीन, जास्मिन आणि लव्हलीनाच्या खेळाने हिंदुस्थानच्या हृदयाचे ठोके उंचावले आहेत. पुरुषांमध्ये अमित पंघाल आणि निशांत देवही पदकी ठोसे मारण्यासाठी मेहनत घेत आहेत.

7 राखीवसह 117 खेळाडू

हिंदुस्थानच्या महापथकात 117 खेळाडू आणि 140 सहकारी सदस्य आहेत. हे महापथक नक्कीच महाकामगिरी करणारे ठरणार, अशी साऱयांना आशा आहे. या पथकात अॅथलेटिक्सच्या 29 खेळाडूंसह नेमबाजांचे 21 खेळाडू आहेत. हॉकीचा संघ 19 खेळाडूंचा असेल. बॅडमिंटनसाठी 7 खेळाडूंचे पथक सज्ज झाले आहे तर कुस्ती आणि तिरंदाजीत प्रत्येकी सहा खेळाडू आपला दम दाखवतील. त्याचबरोबर टेनिस (3), गोल्फ (4), जलतरण (2), नौकानयन (2), अश्वारोहण (2), ज्युदो (1), रोईंग (1) आणि वेटलिफ्टिंग (1) या खेळांमध्ये हिंदुस्थानचे 117 खेळाडू आपला जोर दाखवतील.