कळव्यातील झोपडपट्टीतून चिमुकल्याची मुक्तता, लिव्ह इन रिलेशनमधून जन्मलेल्या बाळाची 10 हजारांत विक्री

लिव्ह इन रिलेशनमधून जन्माला आलेल्या बाळाची जबाबदारी त्या महिलेसोबत राहणाऱ्या पुरुषाने न घेतल्याने या निर्दयी दाम्पत्याने ते चिमुकले गोंडस बाळ कळवा येथील एका कुटुंबाला अवघ्या दहा हजारांत विकून टाकले. 181 क्रमांकाच्या हेल्पलाइनवर फोन खणखणला आणि महिला व बालविकास विभागाच्या सखी केंद्राने पोलीस पथक घेऊन शोधाशोध सुरू केली. अवघ्या तासाभरात कळव्याच्या झोपडपट्टीतून या बाळाची मुक्तता करण्यात आली. या चिमुकल्या गोंडस बाळाला आता दत्तक संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगर येथील एक महिला व पुरुष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यातून ती महिला गर्भवती राहिली आणि तिने गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु आर्थिक चणचणीमुळे तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषाने या बाळाचे पालकत्व स्वीकारण्यास नकार दिला आणि मग त्या दोघांनी मिळून हे बाळ कळवा झोपडपट्टीतील एका कुटुंबाला अवघ्या दहा हजार रुपयांत विकून टाकले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात 181 क्रमांकाच्या हेल्पलाईनवर एका अज्ञाताचा फोन खणखणला आणि या बाळ विक्रीचा पर्दाफाश झाला.

दत्तक घेण्याचे नियम पाळा

उल्हासनगरच्या सखी केंद्राने या बाळाचा शोध घेऊन कळव्याच्या झोपडपट्टीतून त्याला ताब्यात घेतले आणि या मुलाला जन्माला घालणाऱ्या दाम्पत्यावर आणि त्या बाळाला विकत घेणाऱ्यांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बालकाची खरेदी विक्री आणि बेकायदेशीररीत्या बाळाला दत्तक घेणे हा गुन्हा आहे. पालकांना बाळ विकत घ्यायचे असेल तर त्यांनी cara.gov.wcd.in या संकेतस्थळावर जाऊन तेथे नोंद करणे आवश्यक आहे, असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे.