प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; शेवटच्या रविवारी सर्वत्र प्रचारसभा, रॅलींचा ‘संडे धमाका’

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होणार आहे. त्यासाठी गेले 12-13 दिवस राज्यभरात प्रचारसभांच्या धडाक्याने वातावरण चांगलेच तापले. शेवटच्या रविवारी तर सर्वत्र प्रचारसभांचा ‘संडे धमाका’ पाहायला मिळाला. ठिकठिकाणी दिग्गज नेतेमंडळींच्या सभा, रॅली तसेच बैठका पार पडल्या. आता सोमवारी उर्वरित अवघ्या 12 तासांत जाहीर प्रचाराचा जोर दिसणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात झाली होती. प्रमुख शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागात प्रचाराने चांगलाच जोर धरला होता. तापमानात विक्रमी वाढ होऊनदेखील प्रचारसभांवर त्याचा विशेष परिणाम जाणवला नाही. राजकीय पक्ष, उमेदवारांनी ठिकठिकाणी जाहीर सभा, रॅली, कॉर्नर बैठका, प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दिग्गज नेतेमंडळींच्या जाहीर सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्याने राज्यभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापून निघाले. मतदानापूर्वीचा शेवटचा रविवारी असलेल्या 17 नोव्हेंबरच्या सुट्टीचा दिवस अनेक नेत्यांच्या सभांनी गाजवला. सुट्टीच्या दिवसामुळे बहुतांश प्रचारसभांना गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या दणदणीत सभा पार पडल्या. त्यावरून मोठे परिवर्तन घडू शकते, असा अंदाजही राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.

मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी प्रचारासाठी प्रचंड धावपळ केली. एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी सभेला पोहोचताना नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची खूप दमछाक झाली. मुंबईसह कित्येक ठिकाणी अजूनही तापमान 35 अंशांच्याच पुढे असल्याने कार्यकर्ते उकाडय़ाचा त्रास सोसून प्रचारात सक्रिय राहिले.

ठिकठिकाणच्या प्रचारसभांमुळे रस्ते वाहतूक कोलमडली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक मुख्य रस्त्यांवर एकाचवेळी सर्व राजकीय पक्षांची प्रचारवाहने अविरतपणे फिरत होती. त्या वाहनांच्या मागे कार्यकर्ते होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते.

सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होणार असला तरी ज्या विभागात उमेदवारांना अद्याप पोहोचता आले नाही त्या विभागात छुपा प्रचार केला जाणार आहे. उमेदवार प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन मतदारांशी संपर्क साधणार आहेत.