नगर पथविक्रेता समितीची आज निवडणूक आणि निकाल, 67  केंद्रांवर होणार मतदान 

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि 7 परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 समित्यांसाठी उद्या गुरुवार, 29 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. 67 केंद्रांवर यासाठी मतदान होणार असून उद्याच या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण मुंबई महानगरासाठी असलेल्या शिखर समितीसह सात परिमंडळनिहाय समिती अशा आठ समित्यांच्या सदस्यपदासाठी निवड होणार आहे.

केंद्र शासनाच्या पथविक्रेता नियम 2016 मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक घेतली जात आहे. नगर पथविक्रेता शिखर समितीसाठी एकूण 33 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती- 3, इतर मागासवर्ग- 4, अल्पसंख्याक (महिला राखीव)- 2, दिव्यांग (महिला राखीव) – 2, सर्वसाधारण गट (खुला)- 19, सर्वसाधारण गट (महिला राखीव)- 3 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ही जागा तूर्त रिक्त राहणार आहे. दरम्यान, पात्र 237 उमेदवारांची अंतिम यादी गेल्या मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 237 उमेदवारांपैकी 190 पुरुष तर 47 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

32 हजार 415 मतदार

मुंबई पालिका क्षेत्रातील नोंदणीकृत नगर पथविक्रेता मतदारांची एकूण संख्या 32 हजार 415 आहे. परिमंडळ-1 7 हजार 686, परिमंडळ-2 5 हजार 303, परिमंडळ-3 4 हजार 668, परिमंडळ-4 7 हजार 501, परिमंडळ-5 2 हजार 160, परिमंडळ-6 3 हजार 033, परिमंडळ-7 2 हजार 064 मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी प्रत्येक विभाग स्तरावर मतदान केंद्र असतील.