पालिकेने आज एकाच दिवसात कचरा-डेब्रिज आणि उद्यानांमधील तब्बल 778 टन कचरा उचलला. शिवाय बांधकामाच्या ठिकाणचे बॅरिकेड्स आणि रस्ता दुभाजकही धुऊन स्वच्छ करण्यात आला. पालिका आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या तब्बल दोन हजारांवर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम उद्या रविवारीदेखील सुरू राहणार आहे.
मुंबईला स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाकडून विशेष अभियान राबवण्यात येत आहे. मुंबईत विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात राडारोडा साचलेला असतो. शिवाय बॅरिकेडस्वर नागरिकांकडून थुंकण्याचे प्रकारही घडतात. ही दृश्ये मुंबईच्या प्रतिमेला धक्का लावत असल्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
असे झाले काम
- 2047 बॅरिकेड्स स्वच्छ केले. त्यांची लांबी सुमारे 7 किमी आहे.
- या मोहिमेसाठी, डंपर, पाण्याचे टँकर, मेपॅनिकल स्वीपर, फायरएक्स मशीन अशा 185 संयंत्रांचा वापर.
- सुमारे 389 टन कचरा, राडारोडा घनकचरा स्वच्छता विभागाने गोळा केला. एकूण 323 टन बांधकाम व पाडकाम कचरा स्वच्छ केला.
- 52 टन अडगळीतील कचरा, गाळ आणि घनकचरा स्वच्छ केला. 14 टन बागकाम कचरा व वाढलेली झाडेझुडपे हटवण्यात आली.