मोदी सरकारला नडणाऱ्या तृणमूलच्या खासदाराचं फेसबुक पेज हॅक; मेटाकडे तक्रार, कारवाईची मागणी

मोदी सरकारला नडणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. हॅकरने या पेजवरील माहितीसोबत छेडछाड केली. पेजवरील तृणमूल काँग्रेसचे नाव आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याबाबतची माहिती हॅकरने पेजरवरुन हटवली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता या बाबतीत अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनी ‘मेटा’ कंपनीला एक अधिकृत पत्र पाठवत चौकशीची मागणी केली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्या फेसबुक पेजवरून तृणमूल काँग्रेस हे नाव हटवण्यात आले होते. त्यांच्या टीमने ते एडीट करण्याचा प्रयत्न केला, मात्र एडीट करण्याचा पर्यायही काढून टाकण्यात आला होता. त्यानंतर तक्रार झाल्यानंतर पेज पुन्हा पूर्ववत झाले. मात्र मधल्या काळात राष्ट्रीय स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आम्ही मेटाकडे तक्रार दाखल केली, असे अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले.

अभिषेक बॅनर्जी यांचे पेज हॅक झाले की मेटामधीलच कुणीतरी चुकून हे केले की बाहेरच्या व्यक्तीचा यात हात आहे, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही मेटाकडे केली आहे. अचानक एका पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसाचे नाव फेसबुक पेजवरून गायब होणे ही काही साधी बाब नाही. ही एक तर मेटाची चुकी असावी किंवा कुणीतरी जाणूनबुजून हे केले असावे. हा सर्व प्रकार 11 फेब्रुवारी रोजी झाला होता, अशी माहितीही संजय बसू यांनी दिली.