टिटवाळ्यातून शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातला आहे. सिन्नर-घोटी दरम्यान एका चारचाकी वाहनाने साईभक्तांना चिरडल्याने यात तीन भक्तांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मांडा परिसरात शोककळा पसरली आहे.
टिटवाळ्यातील मांडा येथून शनिवारी 13 जुलै रोजी साई आश्रय सेवा मंडळाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात निघाला होता. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सिन्नर-घोटी रस्त्यावर साईभक्तांना एका चारचाकी वाहनाने जोरदार ठोकर दिली. या अपघातात भावेश पाटील व रवींद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिखल्या नावाचा साईभक्त गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी त्याचेही निधन झाले. या घटनेने टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून वाडीवरे पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने वाहनचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पालखीचे आयोजक राम भोईर दिली.