आपत्कालीन साखळी खेचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

गीतांजली एक्सप्रेसची आपत्कालीन साखळी खेचल्याने मध्य रेल्वेची टिटवाळा-कसारा लोकल वाहतूक सुमारे एक तास खोळंबल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन गर्दीच्या वेळेस ही घटना घडल्याने प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.

बुधवारी सकाळी 7.30 वाजता टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान गीतांजली एक्सप्रेसची आपत्कालीन साखळी ओढण्यात आली. त्यामुळे एक्सप्रेस थांबविण्यात आली. हे असतानाच नंतर एक्सप्रेसचा व्हॅक्यूम प्रेशर पाईप फुटल्याने एक्सप्रेस सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी टिटवाळा ते कसारा डाऊन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या एकामागे एक थांबल्याने अप दिशेकडील लोकल उशिराने धावत होत्या.

कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा येथे बराच काळ लोकल थांबल्याने चाकरमान्यांना ताटकळत उभे रहावे लागले. साडेआठ वाजण्याच्या सुमारा गीतांजली एक्सप्रेस मार्गस्थ झाल्याने लोकल सेवा पूर्ववत झाली.