तिरुपती लाडूचा वाद चिघळला, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केला आरोप

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी मिसळली जात होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर देशभरात खळबळ उडाली आणि राजकारण चांगलेच तापले. आता यावर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एन चंद्रबाबू नायडू तिरुमाला तिरुपती देवस्थानमची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप केला आहे.

जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात म्हंटले आहे की, चंद्राबाबू नायडू यांना खोटं बोलायची सवय आहे. ते आपल्या राजकीय फायद्यासाठी कोट्यावधी लोकांच्या आस्थेला धक्का पोहोचवू शकतात. त्यांच्या या खोटं पसरविण्याच्या कृत्यावर कारवाई करुन लोकांसमोर सत्य आणायला हवे. त्यामुळे कोट्यावधी हिंदू भक्तांच्या मनातील संशय दूर होईल आणि तिरुमाला तिरुपती मंदिराचे पावित्र्य कायम राहिल असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. टीडीपीने दावा केला की, गुजरातमधील प्रयोगशाळेने याला पुष्टी दिली आहे. टीडीपी प्रवक्ते अनम वेंकट रमना रेड्डी यांनी एक पत्रकार परिषद घेत कथित प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला. त्यांनी दिलेल्या तूपाच्या नमून्यांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याची पुष्टी केली होती.

केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी आणि गिरीराज सिंह यांनी या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे. तर केंद्रिय मंत्री जेपी नड्डा यांनी चंद्राबाबू नायडू यांच्याकडून तो अहवाल मागवला आहे. दुसरीकडून अमूलने सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना फेटाळले आहे. यामध्ये आरोप लावण्यात आले होते की, तिरुमाला तिरुपती देवस्थानमला अमूलकडून तूप पुरवले जाते. आता अमूल कंपनीने आम्ही कधीही टीटीडी ला तूप पुरवले नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. या वादावर मंत्री आर रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटकच्या सर्व मंदिरांना प्रसाद आणि भक्तांना देण्यात येणाऱ्य़ा जेवणाच्या तयारीसाठी केवळ नंदीनी तूपाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.