मुंबई-नाशिक महामार्गावर सात गाड्यांचे टायर फुटले

मुंबई-नाशिक महामार्गावरील भयंकर खड्ड्यांमध्ये आदळून एकाच दिवसात सात गाड्यांचे टायर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मालवाहू ट्रकचादेखील समावेश आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचा पाहणी दौरा करून तत्काळ खड्डे बुजवतानाच उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाने मुखमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून रस्त्याची डागडुजी कागदावरच राहिली आहे. त्यामुळे मिंधे सरकारचा हा दौरा फार्सच होता का, असा सवाल केला जात आहे.

मुंबई-नाशिक महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार मनमर्जीने काम करत असून खड्ड्यांनी या मार्गावर रोजच वाहतूककोंडी होत आहे. याविरोधात वाहनचालकांनी आवाज उठवल्यानंतर 28 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित यंत्रणांना आदेश देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र रस्त्याची अवस्था जैसे थेच असल्याने मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा एक स्टंट होता काय, असा सवाल वाहनचालक करीत आहेत. महामार्गावरील लाहे फाट्याजवळ एक महाकाय खड्डा पडलेला आहे. हा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने खड्याचा अंदाज न आल्याने आज सात लहान वाहनांसह ट्रक जोरदार आदळून सर्व वाहनांचे टायर फुटले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

रॉक टेक कंपनीवर कारवाईस ठाळाटाळ

मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ते दुरुस्ती व टोलचा ठेका गेल्या अनेक वर्षांपासून रॉक टेक या कंपनीला दिला आहे. पडघा ते कसारा घाट दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्ग सदर ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.