शांतपणे जगू द्यायचे असेल तर आम्हाला लातूर जिल्ह्यात जाऊ द्या! बीड जिल्हय़ातील गुंडगिरीला कंटाळून अंबाजोगाईकरांची आर्त मागणी

>> उदय जोशी

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आणि मराठवाडय़ाची शिक्षण पंढरी म्हणून ओळखले जाणारे अंबाजोगाई बीडमधील भयंकर गुंडगिरी, टोळीयुद्ध, माफियागिरीने हादरून गेले आहे. आम्हाला शांतपणे जगायचे आहे, पण बीडमध्ये ते शक्य नाही. त्यामुळे अंबाजोगाईचा समावेश लातूर जिल्ह्यात करावा, अशी धक्कादायक मागणी समोर आली आहे.

मराठीचे आद्यकवी मुकुंदराजांनी अंबानगरीला साहित्यसंपन्न केले. मराठवाडय़ातील सुसंस्कृत शहर, शिक्षणाचे माहेरघर अशी अंबाजोगाईची ओळख. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे मोठे केंद्र अंबाजोगाई होते. अंबाजोगाई तालुक्यातील हिप्परगा येथे पहिली राष्ट्रीय शाळा उभी राहिली. द्वारकादास लोहिया, शैला लोहिया यांनी ‘मानवलोक’च्या माध्यमातून या शहराची ओळख जागतिक स्तरावर नेली. या शहराने राज्याला अनेक नामवंत डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक दिले. सांस्कृतिक अभिरूची जपणारे हे शहर आज मात्र जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांनी कमालीचे विषण्ण झाले आहे.

परळीतील वाळू माफिया, राख माफिया, मटकामाफिया, क्लबमाफिया, बोगस औषधीमाफिया, शस्त्र्ामाफियांचे अंबाजोगाई हे आश्रयस्थान बनले आहे. हे लोक येतात गुंडगिरी करतात. नेहमीच राडय़ाची धास्ती. कोण केव्हा कट्टा काढेल नेमच नाही, अशी परिस्थिती. असुरक्षिततेच्या भावनेने अंबाजोगाई अस्वस्थ आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही. पिंबहुना पोलीस आणि गुन्हेगार एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा विश्वास आता बळावत चालला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येने ही अंबाजोगाईकरांची अस्वस्थता आणखीच वाढवली असून, त्यातूनच आम्हाला बीडमध्ये राहायचेच नाही, आम्हाला लातुरात पाठवा, अशी मागणी समोर येत आहे.

आमच्या मुलांनी काय आदर्श घ्यावा

सकाळी उठले की हिंसाचाराच्या बातम्या कानावर पडतात. अंबाजोगाई, परळी, केज असो वा जिल्हय़ातील कोणताही तालुका. सकारात्मक काहीच नाही. भयभीत वातावरण आहे. मुलांना शाळेत पाठवावे की नाही, अशी भीती कायम मनात असते. मुलांनी काय शिक्षण घ्यावे आणि काय आदर्श घ्यावा? म्हणूनच आमचा लातूर जिह्यात समावेश व्हावा
उपेंद्र जोशी, अंबाजोगाई

व्यापार चालेना, हप्तेगिरी वाढली

मी छोटासा व्यापारी आहे. व्यापारामध्ये राम राहिला नाही. एक तर कमाईचे साधन कमी झाले आणि जगण्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कोण कोणता गुंड कधी येईल आणि हप्ता मागेल याचा नेम राहिला नाही. चांगले लोक शहरातून जात आहेत. उद्योग कसा करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा असून, दुकान बंद करावे लागते की काय अशी भीती आणि परिस्थिती निर्माण झाली आहे.
युवराज ज्ञानदेव कदम, व्यापारी, अंबाजोगाई

भीतीमुळे पाहुणेही कोणी येईनात

परळीचे लोण अंबाजोगाई शहरात पसरले आहे. अंबाजोगाईहून हे दहशत आणि गुंडगिरीचे लोण आता केजच्या पुढे पोहचले आहे. अशा घटनांमुळे अंबाजोगाई शहराचे नावही बदनाम झाले आहे. दहशत आणि गुंडगिरीमुळे भयभीत वातावरणामध्ये जगावे लागत आहे. एवढेच काय रोज टीव्हीवरच्या आणि पेपरवरच्या बातम्या वाचून भीतीपोटी आमच्याकडे कुणी पाहुणे सुद्धा यायला तयार नाहीत.
शिवाजी बन्सीधर देशमुख