![neehar (18)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-18-696x447.jpg)
सध्याच्या घडीला आपल्याकडे सोलो ट्रॅव्हलिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सोलो ट्रॅव्हल करताना एक आगळा आनंद अनुभवण्यास मिळतो. सोलो ट्रॅव्हल करताना अनेक गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळतात. म्हणूनच हिंदुस्थानात सध्याच्या घडीला सर्व वयोगटातील लोक एकटे भटकताना आपल्याला दिसतात. आता सोलो ट्रॅव्हल करताना आपण नेमकी कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा हे गरजेचे आहे. एकट्याने प्रवासाला निघण्यापूर्वी काही गोष्टी मात्र आपण लक्षात ठेवायला हव्यात. त्याच गोष्टींवर आपण नजर टाकूया.
एकट्याने प्रवास करताना, सर्वात आधी तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात, त्या ठिकाणची माहिती व्यवस्थित जमा करुन ठेवा. आपल्याकडे माहिती असल्यावर, प्रवास करणे हे केव्हाही सोपे होते. आधी सर्व माहिती गोळा करुन ठेवल्यावर आपला प्रवासही सुखकर होतो.
प्रवास करण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही ज्याठिकाणी जाणार आहात, त्याठिकाणी आधी कुणी जाऊन आले असेल तर, तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते. त्यामुळे कुणाचाही सल्ला घेताना अजिबात मागे हटू नका. योग्य सल्ला मिळाला तर तुमची सहल उत्तम होईल.
एकट्याने फिरताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बॅगेचे वजन.. तुमच्या बॅगेचे वजन जितके कमी असेल तितका तुम्हाला फिरताना कमी त्रास होईल. बॅगेचे वजन जास्त असल्यामुळे, तुमच्या फिरण्यावर मर्यादा येऊ शकतात.
कधीही आणि कुठेही एकट्याने प्रवास करताना, मौल्यवान वस्तू फार प्रमाणात जवळ ठेवू नका. मौल्यवान वस्तू हरवल्यास तुम्हालाच भुर्दंड होईल.
प्रवासात सहप्रवाशी किंवा स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधा. स्थानिकांशी संवाद साधल्यामुळे, आपला प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होते.
एकट्याने प्रवास म्हणजे एक अनोखं स्वातंत्र्य असतं. ज्या ठिकाणी जाल ते पिंजून काढा. स्वतःचा वेळ घ्या, म्हणजे एका अनोख्या अनुभवाचे साक्षीदार व्हाल.
गर्दी नसेल अशा जागी तुम्ही फार काळ थांबु नका. एकट्याने प्रवास करताना ही बाब आवर्जुन लक्षात ठेवा. गर्दी नसलेल्या ठिकाणी किंवा एकांतात विपरीत घडण्याची भीती असते.
ज्या ठिकाणी तुम्ही जाल, तिथे तुम्ही खर्चाचा व्यवस्थित अंदाज घ्या. खर्च कमी करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे तिथल्या स्थानिक टूर व्यवस्थापकासोबत ग्रुप बरोबर फिरायला बाहेर पडा.