हिंदुस्थानी खगोलशास्त्रज्ञ दोर्जे आंगचूक यांनी लडाखच्या आकाशात पृथ्वीच्या फिरण्याचा अतिशय मनमोहक असा टाईम्स लॅप्स व्हिडीओ टिपलाय. या अद्भुत व्हिडीओमध्ये पृथ्वी फिरताना दिसतेय, तर आकाशगंगा स्थिर असल्यासारखी भासते. विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आलाय.
दोर्जे आंगचूक हे लडाखच्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचे प्रमुख आहेत. पृथ्वीच्या फिरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना सहजपणे समजावी म्हणून त्यांनी एक खास व्हिडीओ केला. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक मोशन ट्रकर आणि एक्सोजर ट्रान्झिशनसाठी मोबाईल कंट्रोल्सचा वापर केला. चार रात्रींच्या अथक परिश्रमातून त्यांनी हा व्हिडीओ तयार केलाय.
दोर्जे आंगचूक म्हणाले, हा टाईम लॅप्स व्हिडीओ तयार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अत्यंत थंड हवामानात कॅमेऱ्याचा बॅटऱ्या उतरणं किंवा टाईमरची समस्या उद्भवायची.
लडाखच्या अद्वितीय निसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टिपलेले दृश्य खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र समजावून घेण्यासाठी हा व्हिडीओ महत्त्वाचा आहे.