
सकाळच्या सुमारास सांताक्रुज चेंबूर लिंक रोड फेरफटका मारत असताना 69 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून तिघे जण वॅगनार कारने सटकले. पण टिळकनगर पोलिसांनी कौशल्याने तपास करून अंधेरी येते तिघांना पकडण्याची कामगिरी केली.
रसिका भोसले (69) या शनिवारी सकाळी सांताक्रुज-चेंबूर लिंक रोडवर फेरफटका मारत असताना मागून आलेल्या चोराने भोसले यांच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली व अन्य दोघा साथीदारांसह कारने तेथून पळ काढला. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल वाघमारे, उपनिरीक्षक विजय देशमुख व पथकाने तपास सुरू केला. गुन्हा घडल्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पांढऱ्या रंगाच्या वेगवेगळ्या वॅगनार गाडय़ांची पाहणी केली. मग संशयित वाहनांचे एएनपीआर पॅमेरेद्वारे क्रमांक काढून त्यांचे ई चलनद्वारे फाईनचे पह्टो प्राप्त करून घटनास्थळावरील वाहनाची खात्री केली. मग खास बातमीदार व ह्युमन इंटेलिजन्स द्वारे आरोपीचा शोध घेऊन मोहम्मद समीर अन्सारी अहमद शेख (20), मोहम्मद जलील अहमद खान (21) आणि मोहम्मद नशीब मुक्तार अहमद (19) या तिघा आरोपींना घाटकोपर अंधेरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून चोरीचा ऐवज व गुह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.