नववर्ष स्वागतासाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. शहरात जल्लोषात पण शिस्तीत नववर्षाचे स्वागत व्हावे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

नववर्षाचे स्वागत सुरक्षित व निर्विघ्नपणे व्हावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. थर्टी फर्स्टला वाहतूक विभागासह आठ अपर पोलीस आयुक्त, 29 पोलीस उपायुक्त, 56 सहाय्यक आयुक्त, दोन हजार 184 पोलीस अधिकारी, 12 हजार 48 अंमलदार असा तगडा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात असणार आहे. त्याचबरोबर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी पथके, बीडीडीएसची पथके,आरसीपी प्लाटून, होमगार्डदेखील तैनात असणार आहेत.

…तर कठोर कारवाई होणार

दारू ढोसून गाड्या चालविणारे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, महिलांशी गैरवर्तणूक करणारे यांच्याबरोबरच बेकायदेशीर दारूविक्री करणारे आस्थापना, नशेबाजांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे भान ठेवून मस्तीत पण शिस्तीत जल्लोष करावा असे आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.