अॅपवरील तिकीट ठरतेय प्रवाशांची डोकेदुखी; वेळेत प्रवास कसा पूर्ण करायचा, प्रवाशांचा सवाल

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बहुप्रतीक्षित ‘आपली पीएमपीएमएल’ हे अॅप गेल्या महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. या मोबाईल अॅपवरून प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशनबरोबरच तिकीट आणि पास काढता येतो. परंतु, अॅपच्या तिकिटावर प्रवासाची वैध वेळ निश्चित केली आहे. त्या वेळेत प्रवास पूर्ण झाले नाही, तर तिकीट अवैध होते. मात्र, वाहतूककोंडीमुळे निर्धारित वेळेत प्रवास पूर्ण न झाल्यास तिकीट अवैध होत असल्यामुळे प्रवाशांची आणि वाहक, तिकीट तपासणीस यांच्यामध्ये वादावादी होत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए हद्दीत पीएमपीकडून सेवा दिली जाते. मुंबईतील बेस्टच्या ‘चलो अॅप’च्या धर्तीवर पुण्यातही मोबाईल अॅप सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. प्रवाशांना घरबसल्या अॅपच्या माध्यमातून बसचा टाइम कळावा,यासाठी गेल्या काही वर्षांपासून पीएमपी प्रशासनाकडून काम सुरू होते. पीएमपीकडून गेल्या महिन्यात ‘आपली पीएमपीएमएल’ या मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले असून, या अॅपला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस अॅपवरून तिकीट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु, वेळेच्या मयदिमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु पीएमपी प्रशासनाकडून निश्चित वेळेत प्रवास करणे बंधनकारक आहे, असे सांगण्यात आले.

असे होते तिकीट अवैध…

मोबाईल अॅप सुरू झाल्यानंतर वाहक आणि तिकीट तपासणीस यांना प्रवाशांबरोबर नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्रवाशांनी अॅपवरून ते असलेल्या ठिकाणावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करून तिकीट काढल्यावर तिकिटावर तिकीट काढल्याची वेळ आणि तिकिटाची वैधता दाखवली जाते. त्या निश्चित वेळेनंतर तिकीट अवैध होते. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे काही वेळा प्रवास वेळेत पूर्ण होत नाही, अशा वेळी वादावादी होत आहेत.

प्रवाशांना दुहेरी फटका

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना कित्येक वेळा वाहतूककोंडीत अडकून पडावे लागते. वाहतूककोंडीमुळे बऱ्याच वेळा पीएमपीमधून प्रवास करणाऱ्यांना तिकिटावर असलेल्या वैध वेळेत प्रवास पूर्ण करणे शक्य होत नाही. अशावेळी अॅपवरून काढलेले तिकीट ठरावीक वेळेनंतर अवैध होते. अशा वेळी तिकीट तपासणीसाने पकडल्यावर ते तिकीट अवैध असल्याचे सांगून दंड भरायला लावतात. त्यामुळे प्रशासनाने या तांत्रिक त्रुटी दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.