![mumbai kbaddi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mumbai-kbaddi-696x447.jpg)
आपल्या अद्वितीय आयोजनामुळे नेहमीच कबड्डीपटूंच्या आवडीचे मंडळ असलेल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतिचषक कबड्डी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कबड्डीचा थरार अनुभवायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात मुंबई बंदर, मुंबई महानगरपालिका, न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि त्रिमूर्ती एंटरप्रायझेस या चारही संघांनी शेवटच्या मिनिटाला विजयाची सलामी देत पहिल्या दिवसाला रोमहर्षक केले.
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कबड्डीप्रेमींना कबड्डीचा दमदार आणि जोरदार खेळ पाहाण्याचे भाग्य लाभले. मुंबई महानगरपालिकेने ठाणे महानगरपालिकेविरुद्धची लढाई 10-18 अशा पिछाडीनंतरही जिंकली. मनीष जाधव आणि अल्केश चव्हाणच्या कल्पक खेळामुळे मुंबई पालिकेला ठाणे पालिकेवर 35-34 अशी अवघ्या एका गुणाने मात करता आली. मुंबई बंदरने रिझर्व्ह बँकेविरुद्धचा संघर्ष 39-37 असा शेवटच्या चढाईवरच जिंकली. रूपेश साळुंखेच्या चढायांनी हा थरारक विजय मिळवून दिला. त्रिमूर्ती एंटरप्रायझेसने ज्ञानेश्वर शेळके, प्रशांत पवारच्या चढायांची बळावर युनियन बँकेविरुद्ध 28-27 असा विजय नोंदविला. युनियन बँकेच्या ओमकार गाडे आणि आदित्य शिंदे यांनी संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत झुंज दिली, पण त्यांना आपला पराभव टाळता आला नाही. न्यू इंडिया अॅश्युरन्सनेही रूपाली ज्वेलर्सविरुद्धचा थरारक सामना शेवटच्या क्षणाला जिंकला. मध्यंतराला 12-13 अवघ्या एका गुणाने ते पिछाडीवर होते. मात्र मध्यंतरानंतर सुसाट खेळ करत त्यांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. हा सामना न्यू न्यू इंडिया अॅश्युरन्सने 29-26 असा जिंकला.
स्वामी समर्थच्या या दिमाखदार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई आणि स्पर्धेचे आयोजक आणि आमदार महेश सावंत, शाखाप्रमुख संजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला.