मणिपुरात तीन वर्षांच्या मुलाच्या डोक्यात गोळी; शवविच्छेदन अहवालातून उघड

मणिपूरमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 3 मैतेईंचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यातील 3 वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात गोळीची जखम आढळून आली, तर मेंदूचा एक भाग आणि उजवा डोळा गायब होता. मुलाच्या डोक्यात जवळून गोळी झाडण्यात आली असून त्याच्या छातीवर आणि शरीरावर अनेक ठिकाणी चाकूच्या जखमा व हाताला फ्रॅक्चर आढळले. सर्व मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत असून दोन महिलांवर अनेक गोळ्य़ा झाडण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मणिपूरमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी उशिरा राज्य सरकारने इंफाळ खोरे आणि जिरीबाम या 5 जिह्यांमधील शाळा व महाविद्यालये उघडण्याचे दिलेले आदेश मागे घेतले.