धमाक्यांची मालिका सुरूच, तारापूरच्या धरमित कारखान्यात स्फोट; तीन कामगार जखमी

केमिकलवर प्रक्रिया सुरू असतानाच आज सकाळी तारापूरच्या धरमित रिसायकलिंग एलएलपी प्लांटमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन कामगार होरपळले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, धमाक्यानंतर परिसर अक्षरशः हादरून गेला. दरम्यान, वारंवार अशा घटना घडत असताना कारखानदार सुरक्षा व्यवस्थेकडे कानाडोळा करीत असल्याने धमाक्यांची मालिका सुरूच आहे.

तारापूर एमआयडीसीत प्लॉट नं. जी-44 येथे धरमित रिसायकलिंग एलएलपी ही कंपनी आहे. या कारखान्यात आज सकाळी सहा कामगार विविध केमिकल घेऊन त्यावर प्रक्रिया करीत होते. त्यावेळी अचानक झालेल्या स्फोटाने तीन कामगार होरपळले. यामध्ये बलराम वर्मा, रामप्रकाश वर्मा, अंकित वर्मा यांचा समावेश असून त्यांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बलराम वर्मा (50) यांची प्रकृती गंभीर आहे.

केमिकलवर प्रक्रिया सुरू असतानाच दुर्घटना छताचे सर्व पत्रे परिसरात उडाले

स्फोट इतका भयंकर होता की, धमाक्यानंतर या कारखान्यावरील सर्व पत्रे उडून इतरत्र पडले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, स्फोट झालेल्या कंपनीत केमिकलने भरलेल्या हजारो गोण्यांचा साठा तयार करण्यात आल्याची माहिती एका कामगाराने दिली आहे. सुरक्षेविषयी कोणत्याही उपाययोजना न केल्यानेच अशा घटना घडत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.