मालाडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

मालाड पूर्व येथील एसआरएच्या नवजीवन या 23 मजली इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग गुरुवारी दुपारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू तर तीनजण जखमी झाले. गोपाल मोदी (32), सोहन रोथा (26), विनोद केशव (26) अशी मृतांची नावे आहेत. तर जलील शेख (45), रुपसन मामीन (30), मोहम्मद शेख (30) अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी जवळच्या देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मालाड पूर्वेला हाजी बापू रोड, गोविंद नगर येथे नवजीवन ही 23 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत सहा मजूर जखमी झाले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले.

जखमींना तात्काळ देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. तर तीन जखमींपैकी एकाला अतिदक्षता विभागात तर एकाला ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये तर एकाला कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.