बर्ड फ्लूने तीन वाघ, एका बिबट्याचा मृत्यू; नागपुरातील घटनेने विषाणू संसर्गाची चिंता वाढवली

कोरोना महामारीपाठोपाठ आणखी एका महामारीचे संकट जगावर घोंघावत आहे. अनेक देशांत ‘एच 5 एन 1’ अर्थात ‘बर्ड फ्लू’ विषाणू संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या विषाणूने महाराष्ट्राचीही चिंता वाढवली आहे. नागपूर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील तीन वाघ व एका बिबट्याचा ‘बर्ड फ्लू’ची लागण होऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व प्राणिसंग्रहालये, अभयारण्ये व उपचार केंद्रांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ व एका बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर विषाणू संसर्गाच्या संशयातून त्यांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्या चाचणीचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवले होते. प्रयोगशाळेने नमुन्यांचा अहवाल पाठवला असून त्यात तीनही वाघ आणि एका बिबट्याचा ‘बर्ड फ्लू’ अर्थात ‘एच 5 एन 1’ विषाणूची लागण होऊन मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा धक्कादायक अहवाल प्राप्त झाल्यानंतर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयासह संपूर्ण परिसर आणि नागपुरात विषाणू संसर्गाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण रेस्क्यू सेंटर परिसरात दररोज निर्जंतुकीकरण केले जात आहे. ‘एच 5 एन 1’ हा पक्ष्यांमध्ये आढळणारा विषाणू आहे. या विषाणूची वाघ व बिबट्यांना लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ‘एच 5 एन 1’मुळे वाघांचा मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 12 वाघ आणि 24 बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. तीन वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर सर्व वाघ व बिबट्यांचीही चाचणी करण्यात आली. सुदैवाने त्यापैकी कुणालाही विषाणूची लागण झालेली नाही, मात्र खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्या संपूर्ण परिसरात दररोज निर्जंतुकीकरण केले जात आहे. तसेच विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्राण्यांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवले जात आहे.  – सातनीक भागवत, विभागीय अधिकारी, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय (नागपूर)