स्वाक्षरीसाठी तीन हजार शिक्षकांचा पगार रखडला

नागपुरातील शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यापासून भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल झाले आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांच्या एका स्वाक्षरीमुळे भंडारा जिह्यातील तीन हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार थांबला आहे. परिणामी शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

शिक्षकांना एक तारखेला नियमित वेतन देण्याचे आदेश असताना एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस उलटल्यावरही भंडाऱ्यातील शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा झाले नाही. नागपुरात शिक्षक भरती बनावट शालार्थ आयडीचे प्रकरण बाहेर आले आणि भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल झाले. त्यामुळे एका स्वाक्षरीसाठी जिह्यातील सुमारे तीन हजारांवर शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन अडले आहे. पगार देयकावर स्वाक्षरी कोण करणार, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

मुख्याध्यापक प्रकरणात शिक्षण अधिकारी चौकशीच्या रडारवर

नागपूर विभागातील 580 शिक्षक भरती घोटाळ्याची राज्यभर जोरदार चर्चा असून शिक्षण उपसंचालकाच्या अटकेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच भंडारा जिह्यातील मुख्याध्यापकांचे नियमबाह्य प्रकरणामुळे तत्कालीन शिक्षण अधिकारी चौकशीच्या रडारवर आहेत. मात्र विद्यमान शिक्षणाधिकारी गायब आहेत.

फेब्रुवारी महिन्यातील पूर्ण पगार इन्कम टॅक्समध्ये गेला. त्यात मार्च महिन्याचा पगारच झाला नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, औषधं, जीपीएफ, आयकर, गृहकर्ज, विम्याचे हप्ते याच्या कपातीमुळे खर्चाचा मेळ कसा बसवायचा, असा प्रश्न शिक्षांकपुढे आहे.

मार्चच्या वेतनासाठी वेतन पथक कार्यालयाकडे पुरेशी ग्रंट उपलब्ध आहे. त्यामुळे मार्चच्या वेतनाकडे शिक्षकांच्या नजरा होत्या, मात्र ट्रेझरीत बिल सादर करण्यासाठी सही करणारे शिक्षणाधिकारी नसल्यामुळे महिन्याचा पगार अडकून पडला आहे.